
कृतकल्प — नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे.
‘कृत’ हा शब्द कृतज्ञता आणि कृती यांपासून प्रेरित आहे. आयुष्यात जे काही मिळाले त्याची जाणीव ठेवत, त्या जाणिवेतून अर्थपूर्ण कृती करण्याची आठवण तो करून देतो.
‘कल्प’ हा शब्द कल्पना आणि कल्पवृक्ष यांपासून उगम पावतो. तो विचारांची बीजे, स्वप्नांची उंच भरारी, आणि अमर्याद शक्यता यांचे प्रतीक आहे. कल्पना हीच निर्मितीची सुरुवात असते, आणि प्रत्येक विचार नव्या जगाची दारं उघडू शकतो.
कृतकल्प हा या दोन्ही प्रवाहांचा संगम आहे. येथे जाणिवेतून उगवलेली कृती आणि कल्पनेतून फुलणारी निर्मिती एकत्र येतात. या विभागातील कविता आणि लेख हे त्या प्रवासाचे प्रतिबिंब आहेत. विचार, भावना आणि अनुभवांना शब्दांत पकडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
Menu

सगळेच नदीतून पाणी घेऊन जातात पण कधी कोणाला पाणी आणून नदीत टाकताना पाहिलंय का?…
मी एका नदी काठावर बसून आजुबाजूचं निरीक्षण करत होते.
नदीकडे जाणारा प्रत्येकजण आपापल्या गरजेसाठी नदीचं पाणी घेऊन जात होता. पण इतके सगळेजण एवढ्या मोठ्या प्रमाणात तिचं पाणी काढून घेत असून सुद्धा तिचं पाणी मात्र काही कमी होताना दिसत नव्हतं. तिचा प्रवाह आहे तितकाच. हे असं चित्र पाहून मला एक वेगळाच प्रश्न पडला. या इतक्या लोकांच्या गर्दीत मला एकही अशी व्यक्ती सापडू नये की जी त्या नदीत पाणी आणून टाकेल?! बरं, आत्ता गरज असणार्यांबद्दल मी म्हणत नाही पण पूर्वी गरज भागलेल्याचं काय? पण नाही, सगळे फक्त घेतच होते.
शेवटी न राहून मग मी नदीलाच प्रश्न विचारला.
काय गं, सगळेच तुझं पाणी घेऊन जातात कोणीच परत आणून देत नाही. आणि तरीही तू आनंदानं देतच राहतेस. कसं काय जमतं तुला? आणि तुझं पाणी देखील कधीच संपत नाही. अखंड प्रवाह सुरूच असतो. हे कसं काय शक्य आहे?
त्यावर नदीनं नुसतंच स्मितहास्य केलं. पण मी विनंतीच्या नजरेनं तिच्याकडे पाहत म्हटलं सांग ना…
मग ती म्हणाली, ‘या जगात प्रत्येकाचं कर्तव्य ठरलेलं असतं. आणि प्रत्येकजण ते बजावत असतो. पाणी देणं हेच माझं कर्तव्य. आणि अखंड प्रवाहाबद्दल म्हणशील तर त्याची काळजी घेणारा वर्षा ऋतू आहे ना. खरंतर तोच तुम्हाला पाणी देतो. मी केवळ एक माध्यम आहे.’
तिचं हे इतकं निरागस आणि नम्र उत्तर ऐकून मी तिच्याकडे पाहतच राहिले. मग तिला काय वाटलं कुणास ठाऊक पण जाता जाता ती पुढे सांगून गेली की,
‘कोणाला काही देताना परतीची अपेक्षाच मुळी करायची नसते. आणि कोणाकडून काही घेताना परतफेडीची आकांक्षाही मनात बाळगायची नसते. कारण गोष्टी एखाद्या वेळेस परत करता येतात पण वेळ कधीच परत करता येत नाही. सदैव कृतज्ञता बाळगणं महत्त्वाचं. आणि दुसरं म्हणजे जे आपल्याकडे नसतं तेच आपण घेतो आणि जे आपल्याकडे असतं तेच आपण देऊ शकतो. हेच तर निसर्गचक्र आहे.’
समज आणि गैरसमज
घडवणारा आणि बिघडवणारा
हाच तो संवाद.
संवाद ही एक कला आहे. ती प्रयत्नपूर्वक साध्य करता येते. काहींना मात्र ही देणगी उपजतच लाभलेली असते. बरं, संवाद हा फक्त शब्दांनीच शक्य होतो का? तर नाही. तो नेत्रहीन, कर्णबधिर, मूकबधिर या साऱ्यांमध्येही असतोच की. फक्त त्या संवादाची माध्यमं बदलतात. पण संवाद तोच! मानवी जीवनात तर संवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, संवादशैली विकसित आणि प्रगल्भ करण्याच्या गुणांमुळेच तर मानव प्राणी इतरांहून आपलं वेगळं असं प्रबळ स्थान निर्माण करू शकला.
संवादाची शक्ती इतकी अफाट की ती मरगळलेल्या मनात चैतन्य संचारते, हतबल झालेल्या बाहूत बाहुबलीचं बळ देते, पराजयाची किनार क्षितिजावर दिसत असताना सुद्धा लढण्याचं आणि जिंकण्याचं सामर्थ्य देते. निराश मनात आशेचा अंकुर निर्माण करते. आणि आळसावलेल्या गात्रागात्रात स्फुरण चढवते. प्रत्येक शब्दाच्या ध्वनी लहरी आणि कंपनं त्याच्या उच्चाराबरोबर एक विशिष्ट ऊर्जा निर्माण करतात. मग ही ऊर्जाच पुढे इंधन म्हणून कार्य करते.
या संवादाने कित्येक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. कित्येक तंटे, कित्येक समस्या सोडवल्या आहेत. कितीतरी प्रेरणादायक गोष्टी कथन केल्या आहेत. नवीन आशा पल्लवित केल्या आहेत आणि असंख्य बीजं अंकुरली आहेत.
तर असं हे संवादाचं माहात्म्य! आपण ते जाणलं पाहिजे. जपलं पाहिजे.

श्वासाबरोबर सुरु होणारा हा प्रवास, श्वासाबरोबरच थांबतो. या प्रवासात अनेक मार्ग, अनेक पल्ले आणि कित्येक सहप्रवासी भेटतात.
कधी ते मार्ग कच्चे तर कधी पक्के, कधी अडथळ्यांची शर्यत तर कधी तुफान हाय वे. आपल्या हाती असतं ते फक्त त्यावरून मार्गक्रमण करत राहणं. फार फार तर वेळ, परिस्थिती आणि उपलब्ध सोयीसुविधा यांच्या आधारे आपण आपलं वाहन निवडू शकतो. पण प्रवास करत राहणं महत्त्वाचं.
एका नंतर दुसरा पल्ला गाठत राहायचा. तो गाठल्यावर मिळणारा आनंद अनुभवायचा. आणि पुढच्या पल्ल्याची तयारी करायची. या सगळ्यात एक वेगळीच मजा लपली आहे. एक समाधान आहे.
या मार्गात मिळणारे अनेक वाटसरू म्हणजे अनमोल खजिनाच जणू. आपल्याला खूप काही शिकवणारे. काही चांगलं केलं तर कौतुक करणारे. पुढील कामगिरीसाठी प्रोत्साहन देणारे. आणि कधी काही चुकलं तर सांभाळूनही घेणारे. खरंच या पांथस्थांबद्दल जितकी कृतज्ञता व्यक्त करावी तितकी थोडीच.
या प्रवासाची गंमत अशी की फक्त प्रवास करत राहणं एवढंच आपल्या हाती आहे. ते मात्र कधी थांबता कामा नये बाकी प्रवास कधी थांबेल हे श्वासाव्यतिरिक्त कोणीच सांगू शकत नाही.

भानू काळे लिखित ‘अंगारवाटा… शोध शरद जोशींचा’ हे पुस्तक वाचलं आणि त्याद्वारे शरद जोशींच्या व्यक्तित्वाचा परिचय घडून आला. कुशाग्र बुद्धिमत्ता, स्वाभिमान, देशप्रेम, व्यक्तिस्वातंत्र्य, नैतिकता, मनस्वीपणा, चारित्र्यसंपन्नता, समजूतदारपणा इ. अनेक गुणांनी परिपूर्ण असलेलं त्याचं व्यक्तिमत्त्व या पुस्तकात ठळकपणे दिसून येतं.
जोशींना असलेली संस्कृत विषयाची आवड व त्यातील ज्ञान लक्षात घेता ‘पुढे कॉलेजमध्ये तू संस्कृतच घेणार’ असे त्यांचा मित्र म्हणाला पण दुसऱ्या कोणी आपले भविष्य सांगावे हे जोशींना अजिबात आवडले नाही त्यामुळे कॉमर्सला जाऊन अर्थशास्त्राचा अभ्यास करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आणि या एका निर्णयामुळे त्यांचे अवघे आयुष्यच बदलून गेले. कॉमर्सच्या अभ्यासासाठी मुंबईतील सिडनम कॉलेज मध्ये असताना त्यांनी ‘नदी खोरे प्रकल्प आणि भारतीय शेतीच्या विकासातील त्यांचे योगदान’ या विषयावर लिहिलेल्या शोधनिबंधाला प्रथम पुरस्कार मिळाला. शेतीचे वैचारिक बीज जोशींच्या जीवनात या ठिकाणी प्रथम रोवले गेले असावे.
१९५७ साली एम कॉम झाल्यानंतर भगणे सरांच्या आग्रहास्तव जोशींनी कोल्हापूर येथे नव्यानेच सुरु झालेल्या कॉमर्स कॉलेजचे व्याख्यातेपद स्वीकारले. सुरुवातीला अत्यंत कमी बोलणारे आणि काहीसे अलिप्त राहणारे जोशी नंतर मात्र विद्यार्थ्यांत रामू लागले. विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना ते त्यांची पार्श्वभूमी समजून घेऊ लागले. आणि त्यानंतर मात्र त्यांनी अतिशय सोप्या शब्दांत व अत्यंत तळमळीने विद्यार्थ्यांना कॉमर्सचे विषय शिकवले. पुढे ते लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांना पोस्टखात्यात नोकरी मिळाली. देशातील प्रत्येक भागाला एक विशिष्ट पिनकोड देण्याचा खूप मोठा प्रकल्प त्यांच्या कारकिर्दीत पार पडला. या नोकरीत दिल्ली येथे असताना ऑगस्ट १९६७ ते मार्च १९६८ मध्ये टपाल यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी त्यांना फ्रान्सला जाण्याची संधी मिळाली. तिथे ते फ्रेंच भाषा शिकले. फ्रेंच पोस्ट खात्यातील प्रशिक्षणात जाणवलेली वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या अहवालात नमूद केली आहेत. पुढे १९६८ साली त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व स्वित्झर्लंड मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या International Bureau विभागातील नोकरी स्विकारली. तिथे आठ वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
१ मे १९७६ रोजी ते सहकुटूंब भारतात परतले. पुण्यात आंबेठाण येथील साडे तेवीस एकर कोरडवाहू शेतजमीन त्यांनी खरेदी केली. आणि इथूनच त्यांच्या शेतीच्या अभ्यासाला सुरुवात झाली. त्याचबरोबर त्यांनी इतर गावकऱ्यांशीही संवाद साधला. त्यांनी केलेल्या शेतीतील प्रयोगातून असे दिसून आले की कितीही कष्ट केले, कितीही पिकांचे उत्पादन काढले तरी शेतमालाला मिळणारा भाव इतका कमी असे की त्यातून पिकाचा उत्पादन खर्च निघणेही कठीण होई. शेती व्यवसाय तोट्याचा ठरण्यामागे हे प्रमुख कारण होते. शेतीच्या अभ्यासातून बाहेर पडण्याचा मोह होऊ नये म्हणून त्यांनी आपले सर्व पैसे शेतीतच गुंतवले. शेतीतून अगदी माफक पैसे मिळत असल्याने मुलींची हौस-मौज पुरी करणे, त्यांना सहलींना पाठवण्यासाठी लागणारे अतिरिक्त पैसेही त्यांच्याकडे कधी कधी नसायचे तेव्हा एक पिता म्हणून त्यांना खूप वाईट वाटे, दु:ख होई. पण त्याचवेळी त्यांना गावामधील शिक्षणासाठी लागणाऱ्या मुलभूत गोष्टींसाठी तारसणारी मुलं- मुली समोर दिसायच्या आणि यातूनच मग ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ या संकल्पनेचा जन्म झाला.
शेतीचं हे गूढ लक्षात आल्यानंतर त्यांनी शेतमालाच्या रास्त भावाची मागणी केली आणि पहिलं कांदा आंदोलन उभं राहिलं. इथूनच शेतकरी संघटनेची सुरुवात झाली. त्यानंतर ऊस, तंबाखू आणि कापूस आंदोलनंही झाली. या सर्व आंदोलनांना शिस्त असायची. आंदोलनाच्या नावाखाली भलत्याच प्रकारच्या घटना शेतकऱ्यांनी कधीही घडवून आणल्या नाहीत. अगदी रस्ता रोको, रेल रोकोच्या वेळी सुद्धा दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जात असे. शरद जोशी भाषणासाठी उभे राहिले की सर्वजण मोठ्या तन्मयतेने त्यांचे भाषण ऐकत असत. कोल्हापुरात केलेली प्राध्यापकाची नोकरी जोशींना इथे पुरेपूर उपयोगी पडली. अर्थशास्त्रासारखा किचकट विषय ते विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत. इथेही त्यांनी शेतीचे तंत्राज्ञान शेतकऱ्यांना अगदी साध्या सोप्या भाषेत सांगितले. आपल्या अफाट वाचनामुळे परिस्थितीला व तेथील लोकांना लागू पडतील अशी चपखल उदाहरणे ते भाषणांतून देत असत.
या आंदोलन काळात बऱ्याचदा त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात जावे लागले तेव्हा त्यांनी तुरुंगवासही भोगला. एका आंदोलना दरम्यान तर अशी परिस्थिती निर्माण झाली की सारे तुरुंग भरून गेले तेव्हा आता उरलेल्या शेतकऱ्यांना ठेवायचे कुठे असा प्रश्न पोलीसांना पडला. वेळ पडल्यावर स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता जोशींनी उपोषणं देखील केली. आणि हे सर्व करत असताना राजकारणात घुसण्याचा हेतू लांब लांब पर्यंत कुठेही नव्हता. त्यांची स्वार्थी-नि:स्वार्थीपणाची व्याख्याच निराळी होती. इतकं सगळं शेतकऱ्यांसाठी करून सुद्धा मी हे माझ्या स्वार्थासाठी करत आहे यातून माझा शेतीचा अभ्यास सुरु आहे अशी त्यांची धारणा होती.
या सर्व धावपळीत आपल्या कार्यकर्त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घ्यायला ते कधीही विसरले नाहीत. आंदोलनात काही वेळा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही शेतकऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले तेव्हा जोशींनी स्वतः जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले. उगाचच आंदोलन घडवून आणणे आणि सर्वांचे कामकाज ठप्प करणे हा हेतू तर त्यांचा कधीच नसायचा. त्यामुळे योग्य त्यावेळी त्यांनी आंदोलनांना स्थगितीही दिली तर प्रसंगी आंदोलन मागेही घेतले. एकदा पेरणीच्या काळात एक आंदोलन बरेच दिवस सुरु होते तेव्हा मध्येच काही दिवसांची स्थगिती देऊन त्यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी मुक्त केले. दूध आंदोलनाच्या वेळी सरकारने अजिबातच मान तुकवली नाही वर उलट बाहेरून दूध पुरवठा सुरु केला तेव्हा आता आंदोलन पुढे रेटण्यात काही तथ्य नाही. त्यातून काही निष्पन्न होणार नाही हे वेळीच जाणून त्यांनी ते आंदोलन मागे घेतले. अशाप्रकारे जोशींनी भारतातील परिस्थिती लक्षात घेता आंदोलनाचा मार्ग जरी स्वीकारला असला तरी त्यांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी सदैव जागृत ठेवली व सर्वांच्या भाल्याचेच निर्णय ते घेत गेले.
आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवावेत यासाठी त्यांनी ‘वारकरी’ हे साप्ताहिक, ‘शेतकरी संघटक’ हे पाक्षिक सुरु केले. काही पुस्तके प्रकाशित केली त्याचबरोबर प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले. देशपातळीवर शेतकऱ्यांची संघटना निर्माण करावी या दृष्टीनेही ते प्रयत्नशील होते. पंजाब मध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते सहभागी झाले आणि त्यात त्यांनी आपल्या भाषणाद्वारे स्वतंत्र छाप पाडली. पुढे शेतकऱ्यांच्या देशव्यापी सभेचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते परंतु छोट्याशा गैरसमजामुळे एका राजकीय नेत्याने ती बैठक उधळून टाकली आणि लाखोंच्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांना सभा न होताच परतावे लागले. पुन्हा अशा भव्य सभेचे आयोजन होऊ शकले नाही.
व्यक्तिस्वातंत्र्याचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला. स्त्रियांविषयी त्यांच्या मनात कमालीचा आदर होता. स्त्री प्रश्नांचा शोध घेणारं ‘चांदवडची शिदोरी’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं. त्याचबरोबर लक्ष्मी मुक्ती अभियान, सीता मंदिर यांसारखे उपक्रम राबवले.
काही काळानंतर त्यांना जाणवू लागलं की आंदोलनाने केवळ तात्पुरता प्रश्न सुटू शकतो पण शेतीच्या क्षेत्रात देशभर जर आमुलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी राजकीय मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. आणि म्हणून त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याच्या आपल्या भूमिकेत बदल केला. सुरुवातीस त्यांनी कधी इतर पक्षांना तर कधी पारखून घेतलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे धोरण स्विकारले. नंतर ६ नोव्हेंबर १९९४ रोजी त्यांनी ‘स्वतंत्र भारत पक्ष’ स्थापन करून राजाजी यांच्या स्वतंत्र पक्षाचे पुनरुज्जीवन केले. परंतु राजकारणाच्या क्षेत्रात त्यांना पराभव पत्करावा लागला. पुढे २००४ ते २०१० या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी ३२१ चर्चांमध्ये भाग घेतला, १०५ प्रश्न विचारले, १७ संसदीय आश्वासने मिळवली व २ विधेयके मांडली होती. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे ते एकमेव खासदार होते. महिलांच्या सबलीकरणाला जोशींचा विरोध अजिबात नव्हता, किंबहुना ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत १०० टक्के महिलांचे Panel उभे करायचे हा निर्णय शेतकरी महिला आघाडीने अगदी १९८६ सालीच घेतला होता; जोशींचा विरोध हे विधेयक ज्या पद्धतीने अंमलात आणले जाणार होते त्या पद्धतीला होता.
पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी १९९० साली स्थापन केलेल्या कृषी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शरद जोशींकडे सोपवण्यात आली होती. नंतर ही समिती गुंडाळली गेली. जोशींनी मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या अहवालावर पाणी फेरले गेले. त्यानंतर वाजपेयींच्या काळात २००० साली स्थापन झालेल्या Task Force For Agriculture या कार्यगटाचे प्रमुख म्हणून जोशींची नियुक्ती करण्यात आली. WTO च्या डंकेल प्रस्तावासंदर्भात वाटाघाटी करण्याच्या दृष्टीने या गटाची स्थापना करण्यात आली होती. परंतु यावेळीही जोशींना काहीश्या पूर्वीसारख्याच अनुभवाला सामोरे जावे लागले.
जोशींनी दूरदृष्टीने अनेक गोष्टी वेधल्या होत्या. त्यांनी नेहमी खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन केले. चतुरंग शेतीची संकल्पना मांडली. या संकल्पनेला सीता शेती (प्रयोग शेती), माजघर शेती, व्यापारी शेती आणि निर्यात शेती असे चार आयाम होते. याव्यतिरिक्त त्यांनी ‘शेतकरी Solvent’, ‘शिवार Agro’ व ‘भामा Construction’ या तीन व्यावसायिक उपक्रमांच्या संकल्पना मांडल्या. जोशींच्या वैचारिक वारशाचा महत्वाचा भाग असणारी पाच वैशिष्ट्ये कायम प्रेरणादायी ठरतील अशी आहेत ती पुढीलप्रमाणे १) जातिधर्मप्रांतभाषानिरपेक्षता २) अर्थवादी भूमिका ३) शेतीप्रश्न हा फक्त शेतकऱ्यांचा नसून , एकूण देशाचे दारिद्र्य दूर करण्याचा प्रश्न आहे अशी मांडणी ४) आधुनिक तंत्रज्ञानाचा हिरीरीने व नि:संदिग्धपणे केलेला पुरस्कार ५) शेतकऱ्याला देलेला स्वाभिमान.
सरकारने शेतकऱ्यांवर लेव्ही चे नियम लादून एक प्रकारे त्यांची लूटच केली आहे असे जोशींचे मत होते. त्यामुळे त्यांनी नेहमी कर्जमुक्ती हा शब्दप्रयोग वापरला. ‘भीक नको, हवे घामाचे दाम’ ही घोषणा त्यांनी दिली. आणि याच्याही पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, अवजारे इ. मध्ये सवलत देण्यापेक्षा त्याला त्याच्या पिकांचा योग्य मोबदला देऊन सक्षम बनवले पाहिजे अशी त्यांची विचारधारा होती.
इतक्या धावपळीच्या आयुष्यातही जोशींनी आपली वाचनाची आवड सदैव जपली. Somerset Maugham व P. G. Wodehouse हे त्यांचे आवडते लेखक होते. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एक ‘Don Quixote’ लपलेला असतो असे त्यांना वाटे.
आई व पत्नी हॉस्पिटल मध्ये असताना देखील केवळ अनेक दिवसांच्या नियोजनाने ठरलेल्या सभा रद्द कराव्या लागू नयेत यासाठी ते ठिकठिकाणी जाऊन सभेला उपस्थित राहिले. अश्या प्रसंगी त्यांच्या मनाची खूप घालमेल होत असे. प्रसंगी वैयक्तिक कुटुंबापेक्षा सामाजिक कुटुंबाला त्यांनी अग्रक्रम दिला आणि राष्ट्रहित हे वैयक्तिक हितापेक्षा नेहमीच श्रेष्ठ समजून ते आपले कर्तव्य पार पडत राहिले.
अत्यंत सरळ साधेपणा आणि एखद्या व्यक्तीला क्षणांत आपलसं करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. आणि तत्वांच्या बाबतीत तर ते इतके पक्के की तासंतास तिकिटांच्या रांगेत उभं राहावं लागलं तरी चालेल पण Black ने तिकीट घ्यायचं नाही म्हणजे नाही. अशी त्यांची तत्वनिष्ठा. ४००० च्या वर सभा, १९९५ साली Angioplasty, १९९९ साली बायपास सर्जरी, ३ उपोषणं, १६ तुरुंगवास आणि एवढं सगळं करून २००२ साली त्यांनी नर्मदा परिक्रमेचा उपक्रम हाती घेतला.
आयुष्यभरात कितीही संकटं आली, चढ उतार आले तरी जोशी सर मात्र कधीच खचून गेले नाहीत. डगमगले नाहीत. त्यांची कमालीची जिद्द, आशावाद, दृढनिश्चयी वृत्ती आणि प्रचंड उत्साह कायम असे. आज जोशी सर आपल्यात नाहीत. १२ डिसेंबर २०१५ रोजी ते हे जग सोडून गेले. त्यांचे विचार कार्य रूपाने आपल्यात राहावेत हीच इच्छा.
लाव्हा, कवच, तपांबर, स्थितांबर, ओझोनोंबर, दलांबर, बाह्यांबर
आणि या स्तरांच्या पलीकडे गेलं की मग निर्वात पोकळी
DNA, जीव, निरागस मन, महत्वाकांक्षी मन, व्यावहारिक मन, आप्तस्वकीयांसाठीचे मन आणि इतरांसाठीचे मन
यांना भेदून पलीकडे गेलं की मग मात्र भावना शून्य अलिप्त मन
यातली पहिली गोष्ट भौतिकशास्त्राचे सगळे नियम पाळणारी
पण दुसरी कोणत्या नियमांचे पालन करते हे न कळणारी
या निर्वात पोकळीची जागा कधी सूर घेतात, कधी ताल तर कधी रंग
पण ते येतात तसे जातातही आणि मग उरते शून्य
शून्य अगदी वर्तुळासारखं गोल, सममितीच्या असंख्य अक्षांनी समृद्ध
Circular, Centripetal, Centrifugal अशा कित्येक प्रकारच्या गती आणि बलांना सामवून घेणारं,
गरजेनुसार त्यात योग्य तो बदलही करणारं
मनात आणलं तर असीम विस्तारणारं आणि
वाटलं तर एकाच केंद्रबिंदूत विलीन होणारं
पण काहीही झालं तरी केंद्रबिंदू न गमावणारं असं ते वर्तुळ
ग्रह ताऱ्यांचे आकार, गती, कक्षा ठरवणारं,
निर्वातात सुद्धा दिव्याच्या वाती प्रमाणे तेवत राहणारं ते वर्तुळ

अगणित शब्द नि असंख्य विचार
प्रवृत्त करावया संभाषण आचार
निर्मिली मते, काही पुसली गेली
बदलली काही अन कैक दृढ झाली
प्रती संवादे, संवाद प्रति
विषय जगाचा इथे धुंडाळी
शिकविले कसब जे नकळत ते
उत्तराविना संवाद सुरु ठेविते ते
गुरु दर्शित या पथावर
करी शिष्य क्रमण निरंतर
सदैव राहीन यास्तव साभार
कसे व्यक्त करू आभार…
कसे व्यक्त करू आभार…

किती बरं झालं असतं जर मन बाजूला ठेवता आलं असतं
कोणाच्या मनात काय चाललंय हे जर सगळ्यांना समजलं असतं
मनातला आनंद, मनातलं दु:ख
सगळंच कसं काचेसारखं पारदर्शक झालं असतं
लपवा छपवीच्या खेळातलं गमक मात्र हरवलं असतं
किती ही मनाची ओढाताण
कधी कशाच्या मागे, तर कधी कशाच्या पुढे जायची चढाओढ
वाटेतल्या झाडांना मात्र परत भेटीची एकच ओढ
कुणी सांगितला हा खटाटोप
सांगितला कुणीच नाही पण म्हणून का तो थांबतो
अबोलपणा धरूनसुद्धा खूप काही सांगतो
कसं समजवायचं या मनाला
खेळ म्हटलं की हार जीत येणारच पण म्हणून कोणी खेळणं सोडत नाही
आपल्या जिंकण्या हरण्यानं या जगाचं काहीच अडत नाही
कधीतरी तरी समजेल मनाला
मन बाजूला ठेवण्यापेक्षा ते जिथं आहे तिथंच बरं आहे
कारण जगापासून सुरक्षित अशी ती एकच जागा आहे

ही कहाणी आहे प्रश्नांची…
लिखित अलिखित, परिचित अपरिचित, अनुकूल प्रतिकूल
हर तऱ्हेच्या प्रश्नांची
वाऱ्या मागोमाग पाऊस आला अन पावसा मागोमाग वारा
तर दरवळणारा मृद्गंध किती सुखद वाटतो
नाहीतर नुसताच पाऊस पडला तर चिखल-गाळ साचतो आणि
फक्त वाराच वाहत राहिला तर त्याचं वादळात रुपांतर होतं
तसचं प्रश्नोत्तरांचं…
प्रश्नामागून प्रश्न उत्तर शून्य किंवा
उत्तरामागून उत्तरं आणि प्रतिप्रश्न शून्य असं झालं तर…
तर मग तोच प्रश्नरूपी चिखल मनात साचतो आणि तेच वादळ मनात उठतं
एखाद्या विशिष्ठ गंधाच्या सततच्या सानिध्यामुळे जसं गंधहीन व्हायला होतं
तसंच या प्रश्नांच्या गराड्यात राहून राहून नंतर मग ते दिसेनासे होतात
पण नाहीसे होत नाहीत
आणि मग एक दिवस मोठा डोंगर होऊन उभे ठाकतात, उत्तरांच्या शोधात
त्यांना कुठे माहीत असतं की डोंगर कधी हलत नाही आणि त्यामुळे तो कोणाचा पाठलागही करू शकत नाही
उत्तरांना मात्र चालता, धावता आणि उडताही येतं
कधी धीम्या गतीने तर कधी अगदी गरुड विहारा सारखं
पण एक दिवस..
त्यांना गाठण्याचं बळ असणारे पंख या पर्वताला लाभावेत हीच सदिच्छा!

नील नभाच्या छत्राखाली निळाशार हा समुद्र वसे
ब्रीद तयाचे मंथनातुनी जो जे वांच्छील तो ते लाभे ||
स्तब्ध दिसे जरी क्षितीजापरी तरी प्रवाह त्याचा कधी न थांबे
परिवलन अन परिभ्रमणाचे सख्य तया सोबत असे ||
अजब ही त्याची किमया सारी अवघी सृष्टी जणू सामावे
सीमोल्लंघन होता त्याचे प्रलयकारी उद्रेक भयभीत करे ||
समरूप होता द्रव्यांशी संतृप्त द्रावणे निर्मितसे
ज्या क्षणी वाटे त्याक्षणी मग तो प्राणवायू ऊर्जीतसे ||
विभिन्न रंग नी रूपे तयाची सामान्यरुपी अदृश्य भासे
समय सूचकता योजिता ते इंद्रधनू आकाशी पसरे ||

तप्त त्या सूर्यापुढे, पाणी कसे हे शांत राहावे
नाव जीवन असे ते ज्याचे, किती दिवस हे असे जगावे ||१||
क्षितीजापरी दिसे अंत न ज्याचा त्या समुद्राकडे पाहावे
शांत किती जो दिसे तो तरी खवळलेले ते रूप पाहावे ||२||
लाट किनारी ती येणारी, आरसाच जणू दाखवणारी
अंतरंग पण दिसेच तेव्हा, त्सुनामीच ती प्रलयकारी ||३||
दिवसा सूर्य असे सोबती, रात्रीस चंद्र जसा नभी
पल्याड त्याच्या विश्व शोधती जीवन हे जीवांतरी ||४||
ठाव न त्याचा तयास लागे, स्थिती बदले तो त्वरी स्वतःची
पयोधर मग थारा देती विशालाक्ष अंगणी ||५||
किती दिवस ते अतिथी राहती, परलोकी ते स्थिर न राहती
वसुंधरेच्या आठवणीने परतुनी येती या भूवरती ||६||

धकाधकीच्या या जीवनात
स्वतःसाठी वेळ देऊन तर बघा
एकांतवासाच्या दुर्लभ आनंदाची चव
तुम्ही एकदा चाखून तर बघा ||१||
कधी कधी हा वेळ जाता जात नाही
आणि कधी क्षणात निसटून जातो ते कळता कळत नाही ||२||
वेळेसारखं स्वच्छ, सुटसुटीत गणित
अजूनतरी मला सापडलेलं नाही
आणि तरीही ते सोडवता येण्याचं सुख
अद्यापही माझ्या नशिबी नाही ||३||
वेळोवेळी विचार केल्यानंतर एक मात्र लक्षात आलं आहे
की वेळेचं हे समीकरण काही भलतंच निराळं आहे ||४||
काम करताना वेळ पाळणं
आणि वेळ न पाहता काम करत राहणं
म्हटलं तर दोन विरुद्ध दिशा
आणि म्हटलं तर दोन समांतर रेषा ||५||
होतं असं कधी कधी
एकच वेळ आणि तिच्या नाना कळा ||६||

लते एवढी लवचिकता ही अंगी असणे सोपे नाही
त्याहुनीही कठीण असे तो बाणा मोडेन पण वाकणार नाही ||१||
अभिमान नसे की गर्व कशाचा
स्वाभिमान हा ज्याचा त्याचा
स्वैराचारही नसेच मुळी तो
व्यक्तिस्वातंत्र्याचा अमोल ठेवा ||२||
हिणवू दे ही दुनिया सारी म्हणोनी शिष्ठ व आत्मखुशाल
विनय नम्रता ज्याच्या ठायी मग कशास परवा या भूताली ||३||
सत्य वदता धारिष्ट्य येते
असत्य कथता भयाण वसते
पाप-पुण्य ते दुजे का असते
इथेच मन मग पुन्हा गुंतते ||४||
युग पर्वांच्या साक्षीने ही वसुंधरा वनराई नटते
एक ठिणगी ती निमित्त मात्र वणवा पेटुनी होते राख ||५||
परिभ्रमण या विश्वाचे
परिवलन ही नित्य असे
दुर्दम्य अशी ही एकच आस
हाच तो खरा मोकळा श्वास ||६||
मन आणि बुद्धी एक असूनही एक नाहीत
म्हटलं तर खूप फरक आणि म्हटलं तर काहीच नाही ||धृ||
विचारांत गुंतून गुंतून गुरफटून जाते ती बुद्धी,
चुकेनात का निर्णय पण ते घेण्याचे बळ देते ते मन ||१||
सुतावरून स्वर्ग जिला गाठता येतो ती बुद्धी
आणि सगळं काही कळून सुद्धा वळत नाही ते मन ||२||
बुद्धीला फक्त गणितं, समीकरणं, Algorithm आणि Concepts च कळतात,
पण मनाचे चक्षु मात्र अदृश्यही जाणतात ||३||
मनाच्या गतीने धावता आलं तर बुद्धीला ते झेपणार नाही
आणि बुद्धीच्या समीकरणांचा ताळा मनात कधी बसणार नाही ||४||
मन आणि बुद्धीच्या या शर्यतीत कधी मन तर कधी बुद्धी पुढे धावते
पण ज्या क्षणी ते सोबत धावतात त्या क्षणी भोवतालचे विश्वच बदलून जाते ||५||

एक काळ ऐसा होता
स्वयंपूर्ण अन समृद्धीचा
आंग्ल देशीच्या राजवटीने
उधळून टाकीला मार्ग तयाचा||१||
कष्टतो, राबतो, घाम गाळीतो
उगवतो आणिक माणिक मोती
ऊन, वारा, पाऊस, पाखरे;
सतत काळजी करीत राही ||२||
छोटे- मोठे, लहान- थोर
मिळूनी सारे करिती काम
थक्क होऊनी पाहत राहती
जेव्हा हाती मिळते दाम ||३||
अनेक क्रांती होऊनी गेल्या
अनेक योजना आल्या गेल्या
स्थिती परंतु बदलत नाही
कुणास कोडे उमगत नाही ||४||
सूर्य उगवतो क्षितिजावरती
नित्य रोज नियमाने
तसा हा झगडा अखंड अविरत
सुरूच आहे दशकानुदशके ||५||

खेळ या जगाचा
मजला नवीन आहे
नाही कळे किती हा
वैविध्यपूर्ण आहे || धृ ||
अथांग हा पयोधि
सामावूनी ही रत्ने
आकाश हे अभेद्य
उंचावूनीही शिखरे
तरी खेळ हा मनीचा
त्याच्या पल्याड आहे || १ ||
परिपूर्ण हि धरित्री
द्रव्यांची असे ही खाण
क्षितीजावरी मिळे ती
आकाश ही लहान
समजूनी सांग मजला
नियमावली तयाची || २ ||
चंचल असा समीर
क्षणभरात निसटून जाई
दिव्य असा अनल
असे हा ठायी ठायी
ऋतू येती आणिक जाती
परी सत्य हे निरंतर || ३ ||
आजोबा, का असे अचानक न सांगता गेलात तुम्ही
तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या मला,
अजूनही मारायच्या आहेत,
याल का आजोबा…
बसुया पुन्हा अंगणात,
आकाशातल्या चांदण्या मोजत, चांदोबाचं गाणं गात
आणि मग हळूच तुमच्या मांडीची उशी करत.
अजूनही मला तुमच्याकडे कुल्फिसाठी, आईस्क्रीमसाठी हट्ट धरायचा आहे
आणि तुम्हीदेखील तो नेहमीप्रमाणेच पुरवायचा आहे
याल का आजोबा परत, बोलायचंय तुमच्याशी
खूप काही सांगायचं राहून गेलंय ते सांगायचंय
माझी शाळा, माझं कॉलेज दाखवायचंय तुम्हाला
परवा माझा Performance होता कॉलेजमध्ये
तेव्हा माझे डोळे तुम्हाला शोधत होते प्रेक्षकांमध्ये
पण, पण तुम्ही कुठे दिसलाच नाहीत मला,
कुठे गेलात तुम्ही न सांगता, आजोबा,
पुढच्या Performance ला याल का?
येतो म्हणून जर येणार नसाल तर नको मला तुमचं Promise
पण खर सांगू का, तरीही माझे डोळे शोधतच राहतील तुम्हाला,
वाट पाहतील तुमची,
आणि कधी एकदा तुम्ही त्या Performance बद्दल
कौतुकाने माझ्या पाठीवर हात फिरवून शाबासकी द्याल याची
तुमच्या शिवाय ते घर खूप मोकळ मोकळ वाटतं
त्या घरात पाऊल ठेवतानासुद्धा कसंतरीच होतं
म्हणून मी गेलेच नाही आजोबा,
मी गेलेच नाही परत तिकडे.
तुम्ही आलात तर जाऊ आपण
पुन्हा एकदा त्या घरात खेळू आपण
तुम्ही माझ्यासाठी घोडागाडी व्हायचा, झाड व्हायचा,
माझ्या पत्त्यांच्या बंगल्याचा रक्षणकर्तासुद्धा व्हायचा
मला तुमच्यासोबत पुन्हा एकदा पत्त्यांच घर बांधायचंय आजोबा,
मी वाट पाहतीए तुमची, याल का?
लहानपणी तुम्ही मला खूप ठिकाणी फिरायला घेऊन जायचा,
कधी हात पकडून तर कधी अगदी खांद्यावर बसवून
मला पुन्हा एकदा त्या सगळ्या ठिकाणी तुमच्यासोबत जायचंय आजोबा,
सगळ नियोजन झालंय, तिकीट सुद्धा काढून झाली आहेत,
तुम्ही आलात कि लगेच बसू आपण गाडीत,
मी वाट पाहतीए तुमची…
याल ना, आजोबा?


आगमन होता तुझे या पृथ्वितलावरती,
एक वेगळीच बहर आली आमुच्या जीवनयात्री ||
स्वागत असो तुझे या भूतलावरी,
सदैव मिळत राहो तुला आरोग्य, यश आणि कीर्ती ||
निरागसताही तुझी सदैव जपून ठेव,
आयुष्याच्या पथावर प्रामाणिकतेची साथ ठेव ||
जपून ठेव नित्य तू आप्तस्वकीयांचे आशीर्वाद,
सुखाने मार्गक्रमण करीत रहा घेत आयुष्याचा नवा स्वाद ||

